रेड्डी कंपनीवर मनपा प्रशासन मेहरबान... मनपाची वाहने,कर्मचारीही कंपनीच्या दिमतीला

Foto
औरंगाबाद : शहरातील कचरा संकलनाचे कंत्राट देण्यात आलेल्या पी गोपीनाथ रेड्डी या खाजगी कंपनीची प्रशासनाकडून चांगलीच खातिरदारी केली जात असून, मनपाची वाहने वापरण्याकरिता, मोफत पार्किंग देणे, मनपाचे कर्मचारीही दिमतीला ठेवणे आदी गोष्टींवरून कंपनीवर मनपा प्रशासन चांगलेच मेहेरबान झाले असल्याचे दिसून येते.

सुमारे दीड वर्षांपूर्वी नारेगाव येथे कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा कोंडीची समस्या निर्माण झाली होती. यातून मार्ग काढण्याकरिता शासनाने मनपा प्रशासनाला आर्थिक मदत देखील केली. यातून शहरातील चिकलठाणा पडेगाव कांचनवाडी व हर्सूल या चार ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले.  या कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत कचरा घेऊन जाण्याकरिता संकलनाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बेंगलोर येथील पी. गोपीनाथ रेड्डी या खाजगी कंपनीला कचरा संकलनाचे कंत्राट देण्यात आले. त्यापोटी कंपनीला १८६३ रुपये प्रती टन देण्यांत येते. सध्या शहरातील नऊपैकी सात प्रभागांमध्ये कंपनीकडून कचरा संकलन केले जाते. कर्मचार्‍यांचे वेतन वेळेवर न करणे, वर्गीकरण व्यवस्थित न करणे, कचरा चे वजन वाढविण्याकरिता दगड, माती कचर्‍यात टाकण्याचे प्रकार सुरू असतानाही संबंधित कंपनीला मनपाच्या रिक्षा उपलब्ध करून देणे, मनपाचे कर्मचारी कंपनीच्या दिमतीला, ज्या  प्रभागात कंपनीचे कचरा संकलन सुरू आहे त्या प्रभागात मोफत पार्किंग उपलब्ध करून देणे. वेतन मिळाले नाही म्हणून कंपनीचा कर्मचार्‍यांनी  आंदोलन करताच कंपनीची बिले काढणे अशाप्रकारे मनपा प्रशासनाकडून कंपनीची चांगलीच खातिरदारी केली जात असल्याचे दिसते. 

मनपाच्या ५२ रिक्षाचा कंपनी करते वापर
कंत्राट करीत असताना संबंधित कंपनी सुमारे तीनशे ते साडेतीनशे टाटा ए स रिक्षा वापरणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आता संकलनाला सुरुवात करून सुमारे सहा महिने लोटत आले तरी रेड्डी कंपनीच्या केवळ १८० रिक्षा सुरू असल्याचे समजते. या व्यतिरिक्त मनपाच्या तब्बल ५२ रिक्षांचा वापर सध्या कंपनीकडून केला जात आहे. 

पगार मनपाचा आणि काम कंपनीचे
संबंधित कंपनीने कचरा संकलनाचे कंपनीत घेतल्याने त्यांच्याच कर्मचार्‍यांकडून संकलनाचे काम होणे अपेक्षित आहे. असे असतानाही संबंधित कंपनीच्या कर्मचार्‍यांसोबत मनपाचे सुमारे ९० कर्मचारी विविध प्रभागात कंपनीचा दिमतीला देण्यात आले आहे. कर्मचारीच विविध प्रभागांत कचरा गाड्यांमध्ये टाकून घेण्याचे काम करताना नजरेस पडतात.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker